दाजीपुर अभयारण्य

भारतातील अतिसंवेदनशील ठिकाण असणार्‍या पश्चिम घाटात राधानगरी म्हणजेच दाजिपुर अभयारण्य आहे.दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा हा सह्याद्रीमधील महत्त्वाचा जंगलपट्टा आहे.निमसदाहारीत जंगल प्रकारात याचा समावेश होतो. कोल्हापुर जिल्हयाच्या पश्चिमेस असणार्‍या राधानगरी अभयारण्याचा परिसर ३५१ चौ. कि.मि. आहे.समुद्रसपाटीपासूनची याची सरासरी उंची ९०० ते १००० फ़ूट असून येथे सरासरी पर्जन्यमान ४०० ते ५०० मी.मी. आहे.

दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्यचाच एक भाग आहे. पूर्वी हे जंगल शिकारी करता राखीव होते. कोल्हापूर संस्थानचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यावर सन १९५८ ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली.महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य म्हणून याची नोंद आहे. राधानगरी व काळम्मावाडी धरणाच्या भोवतालच्या जंगल परीसराला मिळून सन १९८५ ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.येथील घनदाट जंगलाचे पट्टे डंग या नावाने ओळखले जातात. येथील डोंगरमाथ्यावर जांभा खडकाचे मोठे सडे आहेत.सडयावर व सडयाच्या भोवताली असणार्‍या दाट जंगलामधे एक संपन्न जैवविविधता आढळते.

कॅमेरामध्ये चित्रबध्द

प्राणी :

राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३५ प्रकारच्या वन्यप्राण्याची नोंद झालेली आहे. यामधे दुर्मिळ होत चाललेल्या पट्टेरी वाघ,बिबळ्या व फ़क्त पश्चिम घाटात आढळणारे लहान हरीण गेळा(पिसोरी) यांचा समावेश आहे. तसेच गवा, सांबर,भेकर,रानकुत्रा,अस्वल,चौसिंगा, रानडुक्कर, साळींदर,उदमांजर, खवलेमांजर,शेकरु, ससा,लंगूर याच बरोबर वटवाघळाच्या तीन जाती आढळतात.

पक्षी :

निरीक्षणासाठी राधानगरी वन्यजीव अभयारण्य एक स्वर्गच आहे.राधानगरी अभयारण्यात आजमितीस २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. यामध्ये ग्रेट पाईड हॉर्नबील, निलगीरी वूड पीजन, मलबार पाईड हॉर्नबील, तीन प्रकारची गिधाडे या संकटग्रस्त प्रजातींच्या पक्षांचा समावेश आहे. जगात फ़क्त पश्चिम घाटात आढळणार्‍या पक्षांपैकी १० प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. अभयारण्यातील सांबरकोंड, कोकण दर्शन पॉईंट, सावर्दे, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदीर ही पक्षी निरीक्षणासाठी उत्तम ठिकाणे आहेत.

वनस्पती :

भारतातील राधानगरी अभयारण्याचे महत्व म्हणजे निमसदाहरीत व वर्षाअखेर पानगळीच्या मिसळलेल्या जंगल प्रकारामुळे असंख्य झाडांच्या प्रजातींचे आश्रयस्थान आहे.डोंगरातील दर्‍याखोर्‍यातील घनदाट जंगल,विस्तीर्ण सडे व गवताळ कुरणात असंख्य प्रजातींचे वृक्ष,वेली,झुडपे,ऑर्किड्स,फुले,नेचे, बुरशी आढळतात.अभयारण्यात १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आढळतात. भारतातील द्वीपकल्पामधील प्रदेशनिष्ठ २०० प्रजाती येथील भागात आहेत. ३०० पेक्षा जास्त औषधी वनस्पतींचे हे भांडारआहे.करवंद,कारवी,निरगुडी,अडुळसा, तोरण,शिकेकाई,रानमिरी,मुरुडशेंग,सर्पगंधा, वाघाटी,धायटी इ. झुडपे व वेली मोठ्या प्रमाणात आहेत.

सरिसृप व उभयचर :

सरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली,सरडे,साप-सुरळी आढळतात.उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आढळतात.गांडुळासारखा दिसणारा देवगांडूळ यासारख्या पर्यावरणात महत्वाच्या पंरतू दुर्लक्षीत अश्या उभयचर प्राण्यांच्या जाती येथे आढळतात.एका नव्या पालीच्या प्रजातीचा शोध प्रथमच राधानगरी येथे बी.एन.एच.एस. चे वरिष्ठ संशोधक यांनी लावला.त्या पालीचे नामकरण cenmaspis kolhapurensis करण्यात आले आहे. राधानगरी अभयारण्यात आजमितीस ३३ प्रजातींच्या सापांची नोंद करण्यात आली आहे.ऑलिव्ह ‍फ़ॉरेस्ट स्नेक,एरिक्स व्हिटेकरी,पाईड बेली शिल्डटेल या दुर्मिळ सापांची नोंद झाली आहे.

फ़ुलपाखरे :

१२१ प्रजातींच्या फ़ुलपाखरांची नोंद राधानगरी अभयारण्यात करण्यात आली आहे.सदन बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फ़ुलपाखरु (१९० मी.मी.) असून ग्रास ज्युवेल हे सर्वात लहान फ़ुलपाखरु (१५ मी.मी.) आहे.ही दोन्ही फ़ुलपाखरे राधानगरी अभयारण्यात आढळतात. हजारोंच्या संख्येने एकत्र जमुन सामुहिक स्थलांतर करणारी ब्लु टायगर, ग्लॉसी टायगर, स्ट्राईप टायगर ही फ़ुलपाखरे या ठिकाणी ऑक्टो-नोव्हेंबर महिन्यात आढळतात.

राधानगरी धरण

राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यातील एक धरण आहे. हे धरण भोगावती नदीवर बांधण्यात आले असून त्याचा मुख्य उपयोग शेतीसाठी पाणी पुरवठा व वीज निर्मितीसाठी होतो.

राजर्षी शाहूमहाराजांनी शंभर वर्षांपूर्वी सिंचनाचे महत्त्व ओळखून त्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले. विहिरी, तलाव, छोटे बंधारे अशा अनेक योजनांचा धडाका लावला. राधानगरी धरण म्हणजे या प्रयत्नांच्या मालिकेतील मुकुटमणी आहे. एका छोट्या संस्थानाच्या माध्यमातून महाराजांनी राधानगरी धरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार केला. १९०७ ला त्यांनी धरणाची योजना पुढे आणली.

१९ फेब्रुवारी १९०८ ला गाव नव्याने वसवून त्याचे "राधानगरी' असे नामकरण करण्यात आले. १९०९ ला धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाले. १९१८ पर्यंत धरणाचे बांधकाम ४० फुटांपर्यंत पूर्ण झाले. पुढे निधीच्या कमतरतेमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास १९५७ साल उजाडले. पण तत्पूर्वी पाणी साठवणे सुरू झाले होते. महाराष्ट्रातील एक अतिशय भक्कम धरण म्हणून "राधानगरी' ओळखले जाते. बाकी आजही भक्कमपणाच्या बाबतीत या धरणाला तोड नाही.

धरणाचा उद्देश : सिंचन, जलविद्युत
अडवलेल्या नद्या/प्रवाह : भोगावती नदी
स्थान : फेजीवडे, राधानगरी तालुका, कोल्हापूर जिल्हा,महाराष्ट्र
सरासरी वार्षिक पाऊस : ५५७० मि.मी.
लांबी : १०३७ मी.
उंची : ३८.४१ मी.
बांधकाम सुरू : १९०८
उद्‍घाटन दिनांक : १९५५
ओलिताखालील क्षेत्रफळ : १७२३ हेक्टर
जलाशयाची माहिती
क्षमता २३६.७९ दशलक्ष घनमीटर
क्षेत्रफळ : १८.१३ वर्ग कि.मी.
विद्युत उत्पादनासंबंधित माहिती
टर्बाइनांची संख्या :
स्थापित उत्पादनक्षमता : १० मेगावॉट

शाहुसागर दुधगंगा धरण

डोंगर दऱ्यांमध्ये होणाऱ्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे पंचगंगा, वारणा, दुधगंगा, वेदगंगा यासह डझनभर नद्या दुथडी भरून वाहतात आणि पुढे त्यांचा संगम कृष्णा नदीत होतो. या नद्यांमध्ये बारमाही जलसंचय असतो. राजर्षी शाहू महाराजांनी राधानगरी धरण आणि डझनभर मोठय़ा तलावांची उभारणी करून आपल्या संस्थानांत सदैव पाणी खेळतं राहील याची तजवीज करून ठेवली.

राऊतवाडी धबधबा

निसर्गाची मुक्त उधळण, सर्वदूर पसरलेल्या सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, दाट वनराई, स्वतः च्या नादात भान हरवून गेलेल्या रानवाटा, बोचरी थंडी, दाट धुक्यातून वेड्या-वाकड्या वळणांनी धावणारी पावले, सतत बेभान होऊन कोसळणारा धुवाँधार पाऊस आणि निसर्गाचं साग्रसंगीत घेऊन एका लयीत सुमारे दीडशे फुटावरून अव्याहतपणे कोसळणारा राऊतवाडी-कारिवडेचा धबधबा. हा धबधबा पाहण्यासाठी राधानगरीला भेट द्यायलाच हवी.

स्थापत्य शास्त्राचा उत्तम नमुना असणाऱ्या राधानगरी धरण क्षेत्राला आपण अनेकदा भेट देतोच. पण या धरणाच्याजवळच सहा किलोमीटर अंतरावर असणारा हा धबधबा कारिवडे-राऊतवाडी या दोन्ही गावाच्या दरम्यान हिरव्यागार डोंगररांगांतून वाहतो. सुमारे दीडशे फुटांवरून तो कोसळत असून त्याच्या पायथ्याला आठ ते दहा फुटाचा डोह आहे. त्यामुळे धबधब्यात भिजण्याचा आनंद घेण्याबरोबरच पोहण्याची मस्त मजा येथे घेता येते. एका बाजूने धबधब्याखाली जाणे आणि दुसऱ्या बाजूने वाहत-वाहत धरणाचे बॅकवॉटर जवळ करणे असा दुहेरी आनंद केवळ इथेच मिळतो. नैसर्गिकरित्या या धबधब्याला दोन टप्पे असल्याने दुसऱ्या टप्यावरून खाली कोसळताना तरुणाई बेभान झालेली दिसते.

धबधब्याच्या धारा अंगावर घेताना मुसळधार पाऊसही सतत कोसळत असतो. बोचऱ्या थंडीसह त्याचा आस्वाद घेण्यात एक वेगळीच धुंदी जाणवत राहते. धबधब्याच्या आत गुहा असल्याने अनेकांना जलधारांच्या पातळ पदराआड लपण्याचा खेळ येथे खेळता येतो. या वाटेवरच गैबी घाटातून येताना करंजफेण, कुडुत्री तर रामणवाडीतील अनेक धबधब्यांच्या रांगा दुरून पाहता येतात. जागोजागी छोटी-मोठी हॉटेल्स आणि खासगी व सरकारी विश्रांतीगृहे या परिसरात आपली वाट पाहतात.

तुळशी धरण

राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस असणारा परिसर म्हणजे तुळशी-धामणीचा काठ.तुळशी तलाव हा या परिसरातील लोकांसाठी वरदान आहे. राधानगरी, करवीरसह पाणी टंचाईच्या काळात इचलकरंजी शहरालाही पाणीपुरवठा करणारा हा तलाव या तुळशी नदी तीरावरील जवळपास ८८५५ एकर क्षेत्र ओलिताखाली आणतो.

रामणवाडी धबधबा

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालूक्यात दाजीपूरच्या धनदाट अरण्यात गव्यांच्या सानिध्यात हा धबधबा आहे. राधानगरीतील रामणवाडी या छोट्याशा वाडीजवळ हा जबरदस्त धबधबा कोसळत असतो. हा धबधबा निसर्गाच्या अगदी कुशीत वसलेला आहे. इथे येणं विलक्षण रोमांचकरी ठरतं. पावसाळ्यात खाली आलेले ढग या ढगांमधून चाललेला उन सावलीचा खेळ, हिरवंगार दाजीपूरचं घनदाट जंगल अशा या वातावरणात स्वतःलाही विसरण्याची ताकद आहे.